बुधवार, २१ डिसेंबर, २०११

इंद्रधनूचा साज

तांबडा रंग प्रेमाचा
आयुष्यात या रंगणार का?

नारिंगी रंग थंडाव्याचा
ऊब मला तू देणार का?

पिवळा रंग मैत्रीचा
म्हातारपणी टिकणार का?

हिरवा रंग सधनतेचा
शेतकऱ्यांना लाभणार का?

निळा रंग आकाशाचा
चंद्राला कधी कळणार का?

पारवा रंग अनाकलनीय
समजावून मला सांगाल का?

जांभळा रंग रहस्याचा
गूढ विश्वाचे शोधणार का?

सप्तरंगी साज हा इंद्रधनूचा
कवेत घेता कधी येणार का??

गुरुवार, १४ जुलै, २०११

वेदना

वेदना त्या धुरातच विरल्या
बॉम्बस्फोटांच्या खपल्या अजूनही ओल्या

गमावले प्राण ती जनता निष्पापी
राजकारणी सारेच हे पापी

सूर्याबरोबर हल्ली बॉम्बही उगावतो
अस्ताला जाताना कित्येक प्राणही नेतो'

मुंबईकर  नाईलाजास्तव बाहेर पडतो
स्फोटानंतर आपण त्याला "मुंबईची स्पिरीट" म्हणतो

देशात केला जातो हाय अलर्ट जारी
म्हणजे राजकारण्यांची सुरक्षा भारी

पैसे दिले तरी गेलेलं माणूस परत येत का?
कृतीविना आश्वासनं पूर्ण होऊ शकतात का?


खरच इतकं महाग झाला आहे का हे जगणं?
गरज आहे सरकारनं वेळीच धडा शिकणं!!!!!

सोमवार, २५ एप्रिल, २०११

श्वास


एक अनामिक सोबती माझा श्वास श्वास,
क्षणोक्षणी त्याला जगण्याचा ध्यास

पहिला श्वास  आईच्या कुशीतला,
हे सुंदर जग पाहण्यास आतुरला

एक कोमल श्वास  हुंदक्यात दडलेला,
शाळेत पाऊल टाकताच गालावर सांडलेला

एक परिचित श्वास हृदयात साठवलेला,
सच्चा दोस्त दिसताच मिठीत सामावलेला

सप्तरंगी तारुण्यात  एक श्वास प्रेमाचा,
लाल लाल गुलाबांनी आपली परडी भरण्याचा
  
गर्द काळ्या अंधारात एक भीतीचा श्वास ,
सरळ रस्त्यावरही खोल खड्ड्याचा भास

एक समाधानी श्वास हास्यात लपलेला,
यशोशिखर गाठताच ओठांवर  फुललेला

बुधवार, १६ मार्च, २०११

कळी

एक होती  नाजूक कळी
पानांच्या कोनात दडलेली,
दवबिंदूच्या स्पर्शाने 
उमलण्यास आतुरली

हलका गुलाबी रंग तिचा 
पाकळ्यांनी गर्दी केली,
निद्रावस्थेतली  ती
भ्रमर स्पर्शाने जागी  झाली

फूल होताच तिचे 
पानांतही कुजबूज झाली,
स्तुती ऐकताक्षणी
कळी थोडी बावरली

आनंदी आयुष्य जगली
इतक्यात कोणी तिला खुडली,
आता पानांमध्ये नसलेली ती
आतून दुखावली 

श्रीगणेशाच्या चरणी
कोणी तिला वाहिली,
पूर्वीची ती नाजूक कळी
देवाशी एकरूप झाली