सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

अंबे ला

 "अंबे ला घेऊन जाऊ"..."अंबे ला घेऊन जाऊ"...

स्वयंपाक घरातून सगळी कामे आटपून हुश्श करत मी हॉलमध्ये आले तर "अंबे ला घेऊन जाऊ" चा हट्ट बाळराजे करत होते. दिवसभर वर्क फ्रॉम होम आणि वर्क फॉर होम करून सुद्धा फ्रेश असलेल्या बाबांना मात्र ते वाक्य काही समजत नव्हते. शेवटी बाबांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे "आंबे आणायला जाऊ" असा अर्थ घेऊन मिहिरला विचारले..."आंबे आणायला जाऊ या का?" हे ऐकताच आपण किती वेळा सांगून पण कसे कळत नाही असे एक्सप्रेशन्स देत परत तेच बोबडे बोल त्या चिमुकल्या ओठांत तसेच....


मी पण अवाक्! खेळायला येणाऱ्या बालचमू मध्ये आद्या, आराध्या, आभा असतात. पण हि अंबा कोण असेल बरं??

माझा आपला स्वतःशीच विचार चालू. तर चिरंजीवांनी बोट धरून नेले आणि वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण दिले जणू...


आमच्या हातात त्याचा चिमुकला हात धरून गॅलरीत जाऊन पावसाच्या हलक्या सरींमध्ये भिजायचं होतं त्याला. तेही 'अंबेला' घेऊन! 


तीच हो ती "U for Umbrella" 😃🤗


- मधुरा


#mihirtales

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा